गणेशोत्सवात भक्तीसोबत सायबर सुरक्षेचा संदेश; औराद-शहाजानीत गणेश मंडळात जनजागृती
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। ऑनलाइन फसवणूक, OTP, संशयास्पद लिंक आणि डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर व क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे
जनजागृती


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

ऑनलाइन फसवणूक, OTP, संशयास्पद लिंक आणि डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन

राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर व क्विक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विरूपाक्षेश्वर नवतरुण गणेश मंडळ, औराद-शहाजानी येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले.

यावेळी सायबर वॉरिअर नरेश पंडित व अविष्कार कांबळे यांनी उपस्थितांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, संशयास्पद लिंक, सुरक्षित पासवर्ड, OTP सुरक्षा, सोशल मीडिया वापर, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि डिजिटल व्यवहारातील खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.

अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश आणि लिंक याबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच OTP, पासवर्ड आणि बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नये, असा संदेश देण्यात आला.

सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. डिजिटल युगात प्रत्येकाने जागरूक राहून सुरक्षित इंटरनेटचा वापर करावा, असा संदेश या सत्रातून देण्यात आला.

यावेळी मंडळाच्या अध्यक्ष सौ. गौरम्माताई राघो, उपाध्यक्ष सौ. सुप्रियाताई नंदे व सचिव सौ. आशाताई राघो उपस्थित होत्या. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले.

उपस्थितांनी सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. त्यांच्या शंकांचे निरसन करून सुरक्षित डिजिटल वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande