लवासा येथे सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी पोलीस चौकी; लवकरच होणार कार्यान्वित
रायगड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। लवासा आणि लगतच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासंदर्भात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांच्या समवेत एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये लवासा येथे नवीन पोली
Police outpost to strengthen security arrangements at Lavasa; to become operational soon.


रायगड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। लवासा आणि लगतच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासंदर्भात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांच्या समवेत एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये लवासा येथे नवीन पोलीस चौकी स्थापन करण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. या पोलीस चौकीमुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, पर्यटक आणि संपूर्ण परिसरासाठी पोलीस यंत्रणा अधिक तत्पर आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्थानिक सुरक्षा पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने ही पोलीस चौकी लवकरच प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार असून, यामुळे या भागातील कायदा व सुरक्षेला मोठे बळ मिळणार आहे.

लवासा परिसरातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर तातडीने लक्ष घालून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल 'क्राईस्ट (अभिमत विद्यापीठ), लवासा'च्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांचे आभार मानले. या बैठकीस अॅड. डॉ. स्वाती योगेश, डीन व संचालक डॉ. फा. लिजो थॉमस, डॉ. फा. पीटर एम. व्ही. आणि क्राईस्ट (अभिमत विद्यापीठ), लवासाचे जनसंपर्क अधिकारी श्री. जावेद खान उपस्थित होते.

विद्यापीठ व स्थानिक समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पुणे ग्रामीण पोलिसांसोबत सातत्याने असाच समन्वय व सहकार्य कायम ठेवण्याचा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने यावेळी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande