
डोंबिवली, 18 सप्टेंबर (हिं.स.)।
सार्वजनिक गणेशोत्सवात विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि धार्मिक विषयांवर मोठी आरास साकारून त्यातून वेगळा संदेश देण्याची परंपरा आहे. मात्र घरगुती गणेशोत्सवात अशा प्रकारचे देखावे तुलनेने क्वचितच पाहायला मिळतात. याला अपवाद ठरला आहे टिटवाळा येथील भूमिपुत्र रत्नाकर पाटील यांचा घरगुती गणेशोत्सव.
निमकर नाका, मांडा-टिटवाळा येथील पाटील यांच्या मंगलमूर्ती निवासी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून प्रवेशद्वारावर साकारण्यात आलेली आकर्षक सजावट आणि बाप्पाचे सुंदर पोस्टर्स भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
यंदाच्या देखाव्यात नाथसंप्रदायातील महान योगी म्हणून ओळखले जाणारे मच्छिंद्रनाथ यांच्या जीवनातील पराक्रमाची कथा मांडण्यात आली आहे. विशेषतः मच्छिंद्रनाथ आणि कालिकामातेतील सामर्थ्याचा संघर्ष, त्यानंतर भगवान शंकरांचा हस्तक्षेप आणि मच्छिंद्रनाथांना मिळालेले कालिकास्त्राचे वरदान, हा प्रसंग देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे.
नाथपरंपरेतील आख्यायिकेनुसार तीर्थयात्रेदरम्यान मच्छिंद्रनाथांचा कालिकामातेशी सामना झाला.
दोघांमध्ये अस्त्रविद्या आणि सामर्थ्याची परीक्षा सुरू झाली. विविध मंत्रास्त्रांच्या प्रयोगानंतर मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणास्त्राचा प्रयोग केल्याचे कथेत वर्णन आहे. त्यामुळे कालिकामातेने भगवान शंकराचे स्मरण केले.
यानंतर भगवान शंकर प्रकट झाले. मच्छिंद्रनाथांनी त्यांना नमस्कार केला. त्यांच्या योगसामर्थ्याने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी कालिकामातेला जीवदान देण्यास सांगितले. याच प्रसंगानंतर मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राचे वरदान मिळाले आणि कालिकामातेने त्यांच्या कार्यात सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारल्याचे नाथपरंपरेतील कथन आहे.
मच्छिंद्रनाथांची जन्मकथा, योगसाधना आणि त्यांच्या पराक्रमातील महत्त्वाचे प्रसंग भाविकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे. रत्नाकर धर्मा पाटील, जगन्नाथ धर्मा पाटील
आयुष पाटील, सारिका पाटील, आदित्य रत्नाकर पाटील यांनी या देखावा साकारण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. ही कथा नाथसंप्रदायातील धार्मिक आख्यायिका आणि परंपरागत कथनाचा भाग असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi