
अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। चांदूर बाजार तालुक्यातील चिंचोली काळे परिसरातील शेतशिवारात शिकारीसाठी गेलेल्या दोन जणांनी बंदुकीतून केलेल्या गोळीबारातील शेतात काम करणाऱ्या व्यक्तीच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी तिवसा तालुक्यातील आनंदवाडी येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
चरणसिंग अजितसिंग बावरी (वय ४०) आणि मुन्नासिंग रामसिंग बावरी ( वय ६२, दोघेही रा. आनंदवाडी, ता. तिवसा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत गोवर्धन मोहोड (४५, रा. चिचोली काळे, ता. चांदूर बाजार) हे चिंचोली काळे येथील शेतशिवारात काम करीत असताना दोन अनोळखी शिकारी हरिणाची शिकार करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी शिकाऱ्यांनी छर्ऱ्याच्या बंदुकीतून फायर केले. यातील छर्रे मोहोड यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित शिकारी तिवसा परिसरातील आनंदवाडी येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी दोघेही डुक्कराच्या शिकारीसाठी चिंचोली काळे परिसरातील शेतशिवारात गेले होते. तेथे डुक्कर दिसल्यानंतर त्याच्यावर फायर केला असता त्यातील एक छर्रा खाली लागून तो छर्रा प्रशांत मोहोड यांच्या पायाला लागल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे करीत आहेत.
--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी