
लातूर, 02 सप्टेंबर (हिं.स.)। जळकोट शहरातील द्वारका माता मंगल कार्यालयाच्या पाठीमागील शेतात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सात जणांवर कारवाई केली. या कारवाईत पाच मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी द्वारका माता मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सिद्धेश्वर विश्वनाथ काळे यांच्या शेतात काही जण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
माहितीची खात्री करून पथकाने दुपारी सुमारे ३.४० वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी सात जण सतरंजीवर गोलाकार बसून तिर्रट जुगार खेळत असल्याचे आढळून आले. कारवाईत चंद्रकांत संभाजी धुळशेट्टे (३५), उद्धव दशरथ शिकारे (४७), नयुम करीमसाब कोतवाल (३५), अनवर आशपाक सय्यद (२६), ग्यानोबा बंडू गायकवाड (४२), महेश मनोहर सरकाळे (२५) आणि शिवाजी संतोबा येरपुरवाड (३९) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
आरोपींकडून अंदाजे ५९ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन आणि ४४ हजार ९७० रुपये रोख, असा एकूण १ लाख ३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १२(अ) अन्वये जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis