अध्याय प्रकरण बंद करून देण्यासाठी लाचेची मागणी; अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
लातूर, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। तहसील कार्यालयात सुरू असलेले अध्याय प्रकरण बंद करून देण्यासाठी तसेच पुढील तारीख न देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अहमदपूर तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
लाचलुचपत


लातूर, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। तहसील कार्यालयात सुरू असलेले अध्याय प्रकरण बंद करून देण्यासाठी तसेच पुढील तारीख न देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अहमदपूर तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ४३ वर्षीय शेतकरी असून ते हडोळती, ता. अहमदपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. त्याआधारे तहसील कार्यालय, अहमदपूर येथे अध्याय प्रकरण सुरू होते.

तक्रारदार हे १४ ऑगस्ट रोजी पुढील तारीख विचारण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता तेथील शिपाई मीराताई रामदास काळगे (माहेरचे नाव मीराताई मारूती तीलसरवाड) यांनी, तक्रारदार तारखेला गैरहजर राहत असल्याने त्यांना नोटीस निघेल व गैरहजेरीमुळे तीन महिने कारागृहात जावे लागू शकते, असे सांगितले. तसेच, ‘मी तुमची केस बंद करून टाकते,’ असे सांगून त्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली.

या तक्रारीची १८ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यावेळी संबंधित लोकसेविकेने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती रक्कम स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर १ सप्टेंबर रोजी अहमदपूर तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. अध्याय प्रकरणात पुढील तारीख न देण्यासाठी आणि प्रकरण बंद करून देण्यासाठी तक्रारदाराकडून मागितलेली एक हजार रुपयांची लाच मीराताई तीलसरवाड यांनी दुपारी १२.३६ वाजता स्वतः स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७५/२०२६, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये १ सप्टेंबर रोजी रात्री ११.४३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लोकसेविका मीराताई रामदास काळगे, पद शिपाई, यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५ (३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत माळी यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस निरीक्षक संजय केसरे, पोलीस शिपाई मंगेश कोंडरे, गजानन जाधव, शाहाजान पठाण आणि चालक पोलीस हवालदार संतोष क्षिरसागर यांचा समावेश होता.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास अथवा भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande