
मुंबई, 20 सप्टेंबर (हिं.स.)। मुंबईतील सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बीएमडब्ल्यू कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रेलिंगला धडकून पुलावरून सुमारे ४० ते ५० फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये शानय गज्जल (वय २१), धिर्या सेठ (वय १७) आणि २५ वर्षीय एका अनोळखी तरुणाचा समावेश आहे. जखमींमध्ये २० वर्षीय तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नायर रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
कोस्टल रोडवरील लाला लजपतराय महाविद्यालयासमोर रविवारी पहाटे सुमारे ५ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कार वरळी येथून हाजीअलीच्या दिशेने जात होती. लोटस जेटीजवळ आल्यानंतर भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने रस्त्यालगतचा विजेचा खांब आणि दिशादर्शक फलक तोडत रेलिंगला धडक दिली आणि पुलावरून थेट खाली कोसळली. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
अपघातानंतर कारमधील जखमींना तातडीने उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. पहाटेची वेळ असल्याने अपघाताची माहिती तत्काळ समोर आली नाही. त्यामुळे जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात काहीसा विलंब झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, कोस्टल रोडवर वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या कारचा वेग अत्याधिक असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारमधील तरुणांनी मद्यपान केले होते का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. ताडदेव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत आहे. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली आहे.
प्राथमिक तपासात अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कार सिल्वासा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील चारही तरुण-तरुणी गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी असल्याचेही पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे कोस्टल रोडवरील वेगमर्यादा आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule