
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर (हिं.स.)। जलशक्ती मंत्रालय, प्रमुख केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधन आणि शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, विकास भागीदार, नागरी संस्था आणि खाजगी क्षेत्रातील भागीदारांच्या सहकार्याने 22 ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत भारत मंडपम, नवी दिल्ली येथे हवामान अनुकूल जल व्यवस्थापन या संकल्पनेवर आधारित 9 व्या `इंडिया इंटरनॅशनल वॉटर वीक 2026` (आयआयडब्ल्यूडब्ल्यू) अर्थात भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह चे आयोजन करत आहे. हा पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम धोरणकर्ते, जागतिक जल क्षेत्रातील नेते, तज्ज्ञ, संशोधक, व्यावसायिक, उद्योग, नागरी संस्था आणि तरुण व्यावसायिकांना जल क्षेत्रातील उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि पाणी सुरक्षित तसेच हवामान अनुकूल भविष्यासाठी संवाद, ज्ञान देवाणघेवाण, नाविन्यता आणि भागीदारी करण्यासाठी एक बहुविद्याशाखीय व्यासपीठ प्रदान करेल.
आयआयडब्ल्यूडब्ल्यू-2026 ची प्रमुख वैशिष्ट्ये
उद्घाटन: या कार्यक्रमाचे उद्घाटन 22 सप्टेंबर 2026 रोजी भारताचे माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते, माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
जागतिक सहभाग आणि भागीदार देश: नेदरलँड्स आणि जर्मनी हे देश भागीदार देश म्हणून सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय सहभाग आणि एकत्रीकरण: केंद्र-राज्य सहकार्य आणि हवामान अनुकूल जल व्यवस्थापनासाठी विविध क्षेत्रांचे एकत्रीकरण मजबूत करण्यासाठी 14 राज्ये भागीदार राज्ये म्हणून सहभागी होतील, तर 6 केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना भागीदार मंत्रालये आणि विभाग म्हणून सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
10 मोठे मंच : या कार्यक्रमात धोरण, तंत्रज्ञान, संशोधन आणि अंमलबजावणी या सर्व स्तरांवर संवादाला चालना देण्यासाठी मंत्रीस्तरीय पूर्ण सत्र, जागतिक जल नेतृत्व पूर्ण सत्र, देशीय मंच, जल नेतृत्व मंच, अभ्यासक व व्यावसायिक मंच, विषय आधारित मंच, स्टार्टअप मंच, युवा मंच, औद्योगिक मंच आणि समांतर कार्यक्रमांचा समावेश असेल.
7 प्रमुख उप-संकल्पना: यामध्ये सर्वसमावेशक आणि न्याय्य जल प्रशासन; जलस्रोतांच्या इष्टतम वापरासाठी सहकार्य; जल सुरक्षेसाठी तंत्रज्ञान आणि समुदाय; हवामानाशी संबंधित जोखमींमध्ये पाणी; जल पायाभूत सुविधा आणि आधुनिकीकरणासाठी नाविन्यपूर्ण वित्तीय प्रारुप; शाश्वत जलस्रोत व्यवस्थापन; आणि लोक व ग्रहासाठी पाणी या विषयांवर चर्चा केली जाईल.
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि तंत्रज्ञान प्रदर्शन: 22 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत चार दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित केले जाईल, जे शाश्वत आणि हवामान-अनुकूल जल व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, उत्पादने आणि उपायांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.
आंतरराष्ट्रीय वॉश (डब्ल्यूएएसएच) परिषद: पेयजल आणि स्वच्छता विभागाद्वारे 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाणारी दुसरी आंतरराष्ट्रीय वॉश परिषद 2026 ही पिण्याच्या पाण्याचा प्रवेश, स्वच्छता पायाभूत सुविधा, स्वच्छताविषयक सवयी आणि सार्वजनिक आरोग्य यावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये परवडणाऱ्या आणि शाश्वत उपायांवर भर दिला जाईल.
परिणामभिमुख चर्चा: आयआयडब्ल्यूडब्ल्यू -2026 चा उद्देश ज्ञान आणि संवादाचे रूपांतर कृतीयोग्य शिफारसी, भागीदारी आणि मोजता येण्याजोग्या उपायांमध्ये करणे हा आहे, ज्यासाठी जल सुरक्षा आणि हवामान लवचिकता मजबूत करण्यासाठी धोरण, वित्तपुरवठा, तंत्रज्ञान आणि समुदाय सहभागाला एकत्र आणले जाईल.
समारोप आणि अभ्यास दौरे: या चर्चांचा समारोप 25 सप्टेंबर 2026 रोजी समारोप सत्राने होईल, त्यानंतर 26 सप्टेंबर 2026 रोजी अभ्यास दौरे आयोजित केले जातील. भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह हे भारतातील आणि जगभरातील विविध भागधारकांना अनुभव सामायिक करण्यासाठी, नवकल्पनांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि जल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी एकत्रित आणणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule