बँकॉक-दिल्ली इंडिगो विमानाचे लखनऊत मेडिकल इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशाला रुग्णालयात दाखल
लखनऊ, 20 सप्टेंबर (हिं.स.)।बँकॉकहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानात शनिवारी रात्री उशिरा एका प्रवाशाची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती लक्षात घेऊन वैमानिकाने लखनऊ विमानतळावर वैद्यकीय आपत्का
बँकॉक-दिल्ली इंडिगो विमानाचे लखनऊत मेडिकल इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशाला रुग्णालयात दाखल


लखनऊ, 20 सप्टेंबर (हिं.स.)।बँकॉकहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानात शनिवारी रात्री उशिरा एका प्रवाशाची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती लक्षात घेऊन वैमानिकाने लखनऊ विमानतळावर वैद्यकीय आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोचे ६ई-१०५४ हे विमान बँकॉकहून रात्री सुमारे ८.१५ वाजता दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. हे विमान रात्री ११.१० वाजता दिल्लीला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, प्रवासादरम्यान एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर केबिन क्रूने तातडीने वैमानिकाला याची माहिती दिली.

त्यानंतर वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लखनऊ हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली. परवानगी मिळताच रात्री सुमारे १०.५५ वाजता विमान लखनऊ विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

अचानक झालेल्या या लँडिंगमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विमान उतरताच विमानतळावर आधीच तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाने रुग्णवाहिकेच्या मदतीने संबंधित प्रवाशाला तातडीने गोमतीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विमान सुमारे एक तास लखनऊ विमानतळावर उभे होते आणि सर्व प्रवासी विमानातच बसून होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रात्री १२.०५ वाजता विमान पुन्हा दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande