
नवी दिल्ली , 23 सप्टेंबर (हिं.स.)।राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात देश आणि समाजाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. असे केल्यास देश आणि समाजाच्या प्रगतीसोबतच त्यांचीही प्रगती होईल. राष्ट्रपती महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा यांच्या ७५व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करत होत्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी करण्यापुरता मर्यादित न ठेवता व्यापक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. समाजाच्या व्यापक हितासाठी आपण कशाप्रकारे योगदान देऊ शकतो, याचा विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा, असेही राष्ट्रपती म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “जर विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात देश आणि समाजाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले, तर देश आणि समाजाच्या प्रगतीसोबतच त्यांचीही प्रगती होईल.”अशा प्रकारच्या प्रगतीमुळे विद्यार्थ्यांना मोठे समाधान मिळेल आणि आपल्या शिक्षणाचे सार्थक झाल्याची जाणीव होईल, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती म्हणाल्या, “तुम्ही अभियंता होत असाल, तर लोकांचे जीवन अधिक चांगले करणारे तंत्रज्ञान विकसित करा. तुम्ही डॉक्टर होत असाल, तर वैद्यकीय क्षेत्राकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहू नका. त्याला सेवेचे माध्यम माना.” त्या म्हणाल्या, “सेवेतच मानवता आणि शांतता सामावलेली आहे. त्यातून समाधान मिळते. जीवन जगण्यासाठी साधनसंपत्तीची गरज असते; मात्र पैसा हेच सर्वस्व नाही. इतरांची सेवा केल्यानेच खरे समाधान मिळते.”
राष्ट्रपतींनी सांगितले की, वैज्ञानिकांनी मानवतेच्या हितासाठी समस्यांवर उपाय शोधण्याच्या दिशेने काम केले पाहिजे. तर कलाकार आणि लेखकांनी आपल्या कला आणि साहित्यकृतींच्या माध्यमातून समाजाची संवेदनशीलता अधिक समृद्ध करण्यासाठी योगदान द्यावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode