
कल्याण, 23 सप्टेंबर (हिं.स.)। राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या दिवंगत नेते वसंत डावखरे मानहानी खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. तब्बल १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात कल्याण न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चौघांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश संतोष आगे यांनी बुधवारी या प्रकरणाचा निकाल दिला.
२००९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान या प्रकरणाला सुरुवात झाली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि तत्कालीन शिवसेना उमेदवार आनंद परांजपे यांच्यात लढत झाली होती. २२ एप्रिल २००९ रोजी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत वसंत डावखरे यांचा एक कथित व्हिडिओ दाखवण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते.
मात्र, वसंत डावखरे यांनी व्हिडिओतील वक्तव्य आपले नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला होता. व्हिडिओतील मजकूर निवडकपणे संपादित करून आपली बदनामी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस ठाण्यात मानहानीची तक्रार दाखल केली. या प्रकरणात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांना आरोपी करण्यात आले होते.
या खटल्याची सुनावणी तब्बल १७ वर्षे सुरू होती. दरम्यान, प्रकरणात २०हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून एकूण २0 साक्षी झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे जबाब दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून नोंदवण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींचे कलम ३१३ अंतर्गत जबाब नोंदवून खटल्यातील प्रक्रिया पूर्ण केली होती. सर्व आरोप खोटे असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता.
अखेर बुधवारी कल्याण न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत चौघांचीही निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य दोन आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. निकालानंतर आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया देताना, “वसंत डावखरे साहेब आम्हाला तेव्हा पण आदरणीय होते आणि आजही आदरणीय आहेत. गेल्या १७ वर्षांपासून ही केस सुरू होती. आता आम्हाला न्याय मिळाला,” असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule