
‘तातडीने अटक करा’
मुंबई, 23 सप्टेंबर (हिं.स.)। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जोरदार टीका केली. ज्ञानेश कुमार यांचा विद्रूप, भीषण आणि विभत्स चेहरा जगासमोर आला असून, त्यांना तातडीने तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका टोळीने देशात हैदोस घातला असून, पक्ष फोडणे, पक्ष चोरणे आणि लोकशाहीचा खून करणे, अशा पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हेही आता जनतेसमोर आले पाहिजे. ज्ञानेश कुमार यांच्यासोबतच या टोळीच्या मुख्य सूत्रधारालाही तुरुंगात टाकले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. ही टोळी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती, याचा खुलासा झाला असल्याचा दावाही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
निवडणूक आयोग गृहखात्याच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे सांगितले जात असेल, तर या प्रकरणाचे सूत्रधार गृहमंत्री आहेत का, याचाही खुलासा झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसे असल्यास संबंधितांवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
ज्ञानेश कुमार यांनी सर्वप्रथम शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेचे नाव पहिल्या पोटनिवडणुकीच्या वेळी गोठवण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्या गटाला दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही अशाच प्रकारची पद्धत वापरण्यात आली. काही काळ नाव आणि चिन्ह गोठवून ते दुसऱ्या गटाला देण्यात आले. आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीतही अशीच पद्धत अवलंबली जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास ४५ लाख मतदार मतदारयादीत घुसवले गेल्याचा आरोप त्यांनी केला. आता जवळपास ४० लाख त्याच मतदारांवर निवडणूक आयोगाने एसआयआरच्या माध्यमातून आक्षेप नोंदवला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या निवडणुका रद्द करून संबंधित तीन राज्यांमध्ये पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात आणि त्या मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
“मागील काही वर्षांपासून आम्ही सर्व विरोधक निवडणूक आयोगाच्या किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मनमानीपणे चालणाऱ्या कारभाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. आज ते खरं होताना दिसत आहे. आज ज्याला खरं बंड म्हणतात, निवडणूक आयोग हा या दोन (संधू आणि जोशी) आयुक्तांचा झाला आहे. त्यामुळे या दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आयोगातून काढलं आहे असं मानायला हरकत नाही. कारण या दोन आयुक्तांचं बहुमत झालं आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनमानी पद्धतीने निवडणूक आयोग चालवला जात असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी लढले पाहिजे. मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन ताकद दाखवा, असे आवाहन त्यांनी केले. मर्जीने निवडलेला निवडणूक आयुक्त त्यांना निवडणाऱ्यांच्या घरचे पाणी भरणारच; मात्र असे करताना लोकशाही बुडत असल्याचा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule