
रायगड, 24 सप्टेंबर, (हिं.स.)। मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे केंबुर्ली (ता. महाड) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत १ कोटी ५९ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १ हजार ४८० पेट्यांचा समावेश आहे.
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रायगड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केंबुर्ली येथील हॉटेल निसर्गसमोर पथकाने सापळा रचला. यावेळी संशयित बाराचाकी टाटा ट्रक (क्र. RJ-19-GE-4115) अडवून तपासणी केली असता, ट्रकमध्ये 'रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की'च्या १८० मिली क्षमतेच्या सीलबंद बाटल्यांचे १,४८० बॉक्स आढळले. या कारवाईत १ कोटी ४९ लाख १८ हजार ४०० रुपयांचे विदेशी मद्य, १० लाख रुपयांचा ट्रक आणि ८ हजार रुपयांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राजस्थानमधील भिलवाडा येथील ट्रकचालक प्रभुलाल भंवरलाल साळवी (वय ३५) याला अटक करण्यात आली असून महाड विभागात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अवैध दारूची वाहतूक किंवा विक्री आढळल्यास नागरिकांनी १८००-२३३-९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)