आईला वाचवायला गेलेल्या मुलाचा बापानेच घेतला जीव; देऊळकोंड येथील थरार, आरोपीविरोधात मुंबईतही गंभीर गुन्हे
रायगड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। क्षुल्लक घरगुती वादातून जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाच्या छातीत सुरा खुपसून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पोलादपूर तालुक्यातील लोहारे देऊळकोंड येथे घडली आहे. साई सचिन चिकणे असे मृत मुलाचे नाव असून, आरोपी सचिन बज
khun


karjat


रायगड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। क्षुल्लक घरगुती वादातून जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाच्या छातीत सुरा खुपसून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पोलादपूर तालुक्यातील लोहारे देऊळकोंड येथे घडली आहे. साई सचिन चिकणे असे मृत मुलाचे नाव असून, आरोपी सचिन बजरंग चिकणे (वय ४३) याच्याविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आली असून त्याच्यावर यापूर्वी मुंबईतही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मंगळवारी (दि. २२) दुपारी आरोपी सचिन आणि त्याची पत्नी संध्या पोलादपूर बाजारात सामान खरेदीसाठी गेले होते. दुकानातून सचिन परस्पर निघून गेल्याने दोघांची ताटातूट झाली. काही वेळाने दोघेही देऊळकोंड येथील घरी पोहोचले. घरी आल्यावर संतापलेल्या सचिनने पत्नीला ‘तुला बस डेपोत बोलावले होते, का आली नाहीस?’ असा जाब विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी ‘तुमची सर्वांची मस्ती जिरवतो’ अशी धमकी देत तो थेट किचनमध्ये गेला.

आईला शिवीगाळ करताना पाहून मोठा मुलगा साई वडिलांना शांत करण्यासाठी पुढे आला. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. रागाच्या भरात आरोपी सचिनने कांदा कापण्याच्या सुऱ्याने साईच्या छातीत डाव्या बाजूला जोरदार वार केले. गंभीर जखमी झालेला साई रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. घटनेनंतर आरोपीने महाडच्या दिशेने पळ काढला.

पत्नी संध्या यांच्या फिर्यादीवरून पोलादपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि भादंविच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी सचिन चिकणेवर २०२० मध्ये मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात विनयभंग व धमकावल्याप्रकरणी गुन्हे नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande