लातूरात दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी; २० जणांवर कारवाई
लातूर, 24 सप्टेंबर, (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात विशेष पोलीस पथकाने दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाड टाकून २० जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख
पोलीस कारवाई


लातूर, 24 सप्टेंबर, (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात विशेष पोलीस पथकाने दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाड टाकून २० जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल, चारचाकी आणि दुचाकी अशी एकूण २७ लाख ११ हजार ७४० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते.

देवणीतील शेतात जुगार अड्ड्यावर धाड

पथकाने देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी निवृत्ती सगर यांच्या शेतात तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी ९ हजार ३३० रुपये रोख, ९ मोबाईल, २ चारचाकी वाहने आणि २ मोटारसायकली, असा एकूण १५ लाख ९३ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ९ जणांविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२६/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहरातील बारच्या खोलीत जुगार

त्यानंतर पथकाने लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोका बार ॲण्ड लॉज येथील एका खोलीत तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली.

या कारवाईत १ लाख ७७ हजार ९१० रुपये रोख, १३ मोबाईल, १ चारचाकी वाहन आणि ४ मोटारसायकली, असा एकूण ११ लाख १७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६३/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांत २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन्ही कारवायांमध्ये एकूण २० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, १ लाख ८७ हजार २४० रुपये रोख, २२ मोबाईल, ३ चारचाकी वाहने आणि ६ मोटारसायकली, असा एकूण २७ लाख ११ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.

अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाइनवर द्या

अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ९१५१००१००१ या क्रमांकावर देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande