उत्तर प्रदेश ते जळगाव आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
जळगाव, 03 सप्टेंबर (हिं.स.) मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत आंतरराज्यीय एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पत्र
उत्तर प्रदेश ते जळगाव आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश


जळगाव, 03 सप्टेंबर (हिं.स.) मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत आंतरराज्यीय एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला एमडी निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईचे धागेदोरे जळगाव, मुंबई, ठाणे, रायगड, गुजरातमार्गे थेट उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचले आहेत.या कारवाईत जळगावमधील मेहरुण आणि उस्मानिया पार्क परिसरातील दोन वितरकांसह तब्बल २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ६९ किलो ७५९ ग्रॅम एमडी, १८ लाख ७० हजारांची रोकड, २६० लिटर घातक रसायने आणि मोठ्या प्रमाणावर प्रयोगशाळेतील साहित्य असा सुमारे १३९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता तपासातून पुढे आली आहे.

२४ जून २०२६ रोजी रात्री गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर ते मनवेल पाडा रोड परिसरात सापळा रचण्यात आला. बाबा पार्किंग परिसरातून अविनाश ऊर्फ सोनू लोकनाथ अय्यर (२२) आणि रविकांत ओमप्रकाश राम (२३) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत ११२ ग्रॅम एमडी, किंमत सुमारे ३ लाख ३६ हजार रुपये, आढळून आले. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रकरणाचा सखोल तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ कडे सोपवण्यात आला.

तपासादरम्यान आरोपींच्या चौकशीतून या मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटची माहिती समोर आली.तांत्रिक तपास आणि आरोपींच्या चौकशीत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात एमडी तयार करण्याची अवैध फॅक्टरी सुरू असल्याचे समोर आले. अबडासा तालुक्यातील सांधाण गावातील शेतजमिनीत आरोपी जुम्मा तालाब ठाकरा याच्या मालकीच्या जागेवर ही फॅक्टरी उभारण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई करत फॅक्टरीचा शोध घेतला आणि जुम्मा ठाकरा याला अटक केली. तपासादरम्यान ‘जालिम गँग’शी संबंधित आरोपी आर्यन हरुण सय्यद ऊर्फ जालिम याने एमडी तयार करण्यासाठी लागणारे लॅब साहित्य आणि रसायने रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच आरोपी जाहीद शेख ऊर्फ जावेद भाई याने हा मुद्देमाल विरार-जेएनपीटी महामार्गावरील रायते, कल्याण परिसरात फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावत सर्व मुद्देमाल जप्त केला.बईतील कापडिया नगर, कुर्ला परिसरातून मोहमद हसीब सिध्दीकी ऊर्फ इजाज मर्चेंट याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ११ किलो ८०४ ग्रॅम एमडी आणि १८ लाख ७० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. हसीब सिध्दीकीच्या चौकशीतून एमडीचा मोठा साठा जळगावला पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात कारवाई करत मेहरुण येथील रहिम ताहेर पिंजारी (२८) आणि उस्मानिया पार्क येथील सय्यद मुशाइद अली मुमताज अली (३९) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ९११ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे नेटवर्क समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande