वाशी मनपा रुग्णालयात उपचाराचा हलगर्जीपणा?; मुदतबाह्य सलाईन लावल्याचा आरोप
रायगड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला मुदतबाह्य सलाईन चढविल्याने त्याची प्रकृती खालावल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी खासग
वाशी मनपा रुग्णालयात उपचाराचा हलगर्जीपणा?; मुदतबाह्य सलाईन लावल्याचा आरोप


रायगड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला मुदतबाह्य सलाईन चढविल्याने त्याची प्रकृती खालावल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर नातेवाईकांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाशी रुग्णालयात ठिय्या आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली.

गोपीराम खडसे (५०) यांना ३१ ऑगस्ट रोजी ताप व चक्कर येत असल्याने वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी सकाळपासून दुपारपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, त्यानंतर अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिरानंदानी (फोर्टीस) रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, उपचारादरम्यान खडसे यांना मुदत संपलेली सलाईन लावण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. सलाईननंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे तक्रार करूनही वेळीच दखल घेतली नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना महापालिकेच्या कोट्यातून हिरानंदानी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले. मुदतबाह्य सलाईनबाबत तक्रार प्राप्त झाली असून, चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महापालिका आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांच्या माहितीनुसार, खडसे यांना डेंग्यूची लागण झाली असून प्लेटलेट्सची संख्या सुमारे ४० हजारांवर आली आहे. त्यामुळे प्रकृती खालावण्याचे कारण केवळ मुदतबाह्य सलाईनच असल्याचे सध्या निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मुदतबाह्य औषध किंवा सलाईन रुग्णाला देणे ही गंभीर बाब असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande