रिक्षाचे परमिट नावावर करण्यासाठी साडेचार हजारांची लाच; आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात
रायगड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। रिक्षाचे परमिट नावावर करण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःसाठी तसेच लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आरटीओ एजंट विलास गणपती सनगर (६२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाने र
Bribe of ₹4,500 demanded to transfer rickshaw permit to one's name; RTO agent falls into ACB's trap.


रायगड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। रिक्षाचे परमिट नावावर करण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःसाठी तसेच लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आरटीओ एजंट विलास गणपती सनगर (६२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी खारघर आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारे विद्यालय चालवितात. रिक्षाचे परमिट आपल्या नावावर करण्यासाठी त्यांनी आरटीओ एजंट सनगर यांच्याशी संपर्क साधला होता. या प्रक्रियेसाठी २५ हजार ७०० रुपये शासकीय शुल्क असल्याचे सनगर यांनी तक्रारदाराला सांगितले. मात्र, त्याव्यतिरिक्त स्वतःसाठी आणि लोकसेवकाच्या नावाने आणखी ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने ११ ऑगस्ट २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर सनगर यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी खारघर आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. सनगर यांनी तक्रारदाराकडून ४ हजार ५०० रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर खारघर आरटीओ कार्यालय परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक निता भासेले यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पर्यवेक्षणाखाली पथकाने कारवाई केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande