
मुंबई, 05 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच या उत्सवाला काही दुर्घटनांचे गालबोट लागले आहे. मुंबईसह ठाणे, पुणे आणि राज्यातील विविध भागांत गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याची चुरस पाहायला मिळत आहे. मात्र, मुंबईत दहीहंडी फोडताना झालेल्या दुर्घटनेत एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मालाड परिसरात दहीहंडी फोडताना बाजूचा कॉलम कोसळल्याने मुलाच्या डोक्याला गंभीर मार लागला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मुंबईतील विविध शासकीय आणि बीएमसी रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ३२ गोविंदा जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी २८ गोविंदांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून, चार गोविंदांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीटी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक २९ जखमी गोविंदांची नोंद झाली आहे. त्यापैकी चार जणांवर उपचार सुरू असून २५ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. ईएस रुग्णालयांमध्ये दोन गोविंदा जखमी झाले असून दोघांनाही उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच डब्ल्यूएस रुग्णालयात एका जखमी गोविंदाला दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करून त्यालाही घरी सोडण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या एकूण चार गोविंदांवर उपचार सुरू आहेत.
एकीकडे दुर्घटनांच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ठाण्यात टेंभी नाका, तलावपाळी, वर्तकनगर, रघुनाथनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड परिसरात मोठ्या दहीहंडींचे आयोजन करण्यात आले. वर्तकनगर येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दहा थर रचणाऱ्या पथकाला ११ लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे.
या सोहळ्याला भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याने उपस्थिती लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. ‘प्रो गोविंदा’ हा देशी खेळ ऑलिम्पिकमध्ये नेण्याचे लक्ष्य ठेवून मेहनत करण्याचे आवाहन त्याने केले. दरम्यान, घाटकोपरमधील मनसेच्या दहीहंडी उत्सवात बाराखडी, एमपीएससी, जेईई आणि नीट परीक्षांशी संबंधित पोस्टर लावून पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जनजागृती करण्यात आली.
दादरच्या आयडियल बुक डेपो परिसरात जॉली स्पोर्ट्स क्लबच्या महिला गोविंदा पथकाने पाच थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडली. विशेष म्हणजे, कोणतीही पडझड न होता हा थर सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने रचण्यात आला. दरम्यान, प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत कोणतीही अन्य गंभीर अनुचित घटना नोंदवण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule