केरळममध्ये भीषण अपघात; तामिळनाडूतील ८ इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचा मृत्यू
तिरुवनंतपुरम, 05 सप्टेंबर (हिं.स.)। केरळमच्या त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात तामिळनाडूतील आठ इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. काइपमंगलमजवळ राष्ट्रीय महामार्गावर रात्री सुमारे ११.४० वाजता हा अपघात झाला.
Kerala Road Accident Tamil Nadu Engineering Students Killed In Crash


तिरुवनंतपुरम, 05 सप्टेंबर (हिं.स.)। केरळमच्या त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात तामिळनाडूतील आठ इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. काइपमंगलमजवळ राष्ट्रीय महामार्गावर रात्री सुमारे ११.४० वाजता हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, धडकेनंतर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. काही विद्यार्थ्यांचे मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी गुरुवायूरहून कोडुंगल्लूरच्या दिशेने प्रवास करत होते. अपघाताच्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याच ठिकाणी काही ट्रक रस्त्यावर उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या विद्यार्थ्यांच्या कारने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला कळवले. त्यानंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. कारची अवस्था अत्यंत खराब झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठे प्रयत्न करावे लागले. यातील दोन मृतदेह कारखाली अडकले होते. अथक प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले.

मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून विश्व (२०), सूर्या (२०), संतोष (२०), प्रसन्ना आणि युवसंजीत (२०) यांच्यासह आठ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. विद्यार्थी तामिळनाडूतील पीएसएनए इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत होते. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन त्रिशूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात पाठवले आहेत. मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या मार्गावर यापूर्वीही वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande