शिक्षण आता केवळ पैसा कमावण्याचे साधन बनले - प्रा. डॉ. राजन गवस
सोलापूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार व्हावा, समाज घडावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून चांगली पिढी निर्माण व्हावी, यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्या महापुरुषांचे शिक्षणा विषयक स्वप्न आज भंगले आहे. शिक्षणातून समाज घडविण्या
Pran


सोलापूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार व्हावा, समाज घडावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून चांगली पिढी निर्माण व्हावी, यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्या महापुरुषांचे शिक्षणा विषयक स्वप्न आज भंगले आहे. शिक्षणातून समाज घडविण्याऐवजी आपण शिक्षणाच्या माध्यमातून केवळ पैसा कमावणार्या लाचारांच्या फौजा तयार केल्या आहेत, अशी परखड टीका नामवंत लेखक व परिवर्तनवादी विचारवंत प्रा. डॉ. राजन गवस यांनी केली.

लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षकरत्न व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख होते.

प्रा. डॉ. राजन गवस यांनी राजकीय पक्षांमध्ये शिक्षणाबाबत असलेली अनास्था तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनातील गैरसमज यावरही स्पष्टपणे भाष्य केले. कोणत्याही पालकाला आपला मुलगा किंवा मुलगी शिक्षणातून चांगला माणूस म्हणून घडावा, अशी अपेक्षा नसते असे नाही; मात्र अनेक पालकांचे लक्ष मुलाने किंवा मुलीने शिक्षणातून किती पैसा कमवावा, याकडे अधिक लागलेले असते, असे त्यांनी सांगितले.

पुरस्कार वितरण या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या नऊ शिक्षकांचा तसेच दोन आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, पुस्तके आणि मानपत्र असे होते. यावेळी आमदार देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी लोकमंगल फाउंडेशनच्या लोटस’ योजनेतून हुशार विद्यार्थ्यांना मदतीचे धनादेशही प्रा. डॉ. राजन गवस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. डॉ. ह. ना. जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ऍड. गजानन भाकरे यांनी प्रास्ताविक केले. राजकिरण चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. नागनाथ येवले आणि अरविंद जोशी यांनी पुरस्कार विजेत्यांची माहिती दिली.

या शिक्षकांचा झाला सन्मान

प्राथमिक विभागातील शिक्षक हनुमंत सिद्धराम बनसोडे (उपरी, ता. पंढरपूर) आणि गौरेशंकर खोबरे (सिंदखेड, ता. द. सोलापूर) यांना, माध्यमिक विभागातील शिक्षिका श्रुती बागेवाडी (सोलापूर) आणि संजय भस्मे (सोलापूर) तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्रसन्न नाझरे (सोलापूर) आणि गणेश मुडेगावकर (सोलापूर) यांचा शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्रीनिवास मेतन आणि डॉ. बाळकृष्ण लोखंडे यांना पुरस्कार देण्यात आला. सोलापूरचे नाव मोठे करणारे आणि लंडनमध्ये स्वतःचा उद्योग सुरू करणारे युवा उद्योजक तेजस संजीव कुसूरकर यांचे शिक्षक कौस्तुभ गोडबोले यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात आले. सांगोला तालुक्यातील शिवणे गावच्या शेळकेवाडी येथील जि. प.प्राथमिक शाळा तसेच दक्षिण तालुक्यातील कारकल येथील जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा म्हणून गौरविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande