
पुणे, ७ सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवंती आर. देशपांडे तसेच संयुक्त दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग डी. डी. पाटील उपस्थित होत्या.
यावेळी डी. डी. पाटील यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे तसेच समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
रेवंती आर. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. कायद्याचे पालन करून जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु