शिरोलीसाठी स्वतंत्र नगरपालिकेचा प्रयत्न करणार- आ. अमल महाडिक
कोल्हापूर, ७ सप्टेंबर (हिं.स.)। शिरोली गावाचा समावेश कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीत किंवा कोणत्याही प्राधिकरणात न करता, गावासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी ग्रामस्थांना दिले.शि
शिरोली पुलाची गावच्या ग्रामसचिवालय इमारतीचा पायाभरणी समारंभ


कोल्हापूर, ७ सप्टेंबर (हिं.स.)। शिरोली गावाचा समावेश कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीत किंवा कोणत्याही प्राधिकरणात न करता, गावासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी ग्रामस्थांना दिले.शिरोली पुलाची येथील ग्रामसचिवालयाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पद्मजा करपे होत्या.

यावेळी आमदार अमल महाडिक म्हणाले की, एक आमदार किती विकासकामे करू शकतो, हे करवीर दक्षिण विधानसभा मतदारसंघात दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे शिरोलीमध्ये राजकारणविरहित गावाचा विकास हे उद्दिष्ट ठेवून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे करण्यात आली आहेत.ग्रामसचिवालयाच्या इमारतीसाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, प्रशस्त क्रीडांगण, पाणंद रस्ते यांसह विविध विकासकामांसाठी यापुढेही कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार अशोकराव माने यांनी शिरोली ग्रामसचिवालयाच्या इमारतीसह विविध विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. सरपंच पद्मजा करपे यांनी ग्रामसचिवालयाची इमारत वर्षभरात पूर्ण व्हावी आणि निधीअभावी काम थांबू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांनी शिरोली गावात जिल्हा परिषद तसेच समाजकल्याण विभागामार्फत जास्तीत जास्त विकास प्रकल्प आणि वैयक्तिक लाभाच्या योजना आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य कमल कौंदाडे आणि डॉ. सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे स्वागत बाजीराव पाटील यांनी केले, तर आभार माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी मानले. यावेळी नागाव पंचायत समिती सदस्य अरुण माळी, उपसरपंच विजय जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, वडगाव बाजार समितीचे चेअरमन सुरेश पाटील, माजी उपसरपंच राजेश पाटील, दिलीप पाटील, प्रकाश कौंदाडे, विठ्ठल पाटील, उदय पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande