
नाशिक, ७ सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक शहरातील ठक्कर बाजार बसस्थानकात रविवारी रात्री सुमारास झालेल्या भीषण अपघातात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी निघालेल्या १७ वर्षीय तरुणीचा एसटी बसच्या मागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. आकांक्षा रामभाऊ शेलार असे मृत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा ही आपल्या कुटुंबीयांसमवेत त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आली होती. रविवारी रात्री बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. बस पकडण्याच्या घाईत प्रवाशांमध्ये लोटालोट सुरू असताना आकांक्षाला अचानक जोराचा धक्का लागला. त्यामुळे ती जमिनीवर कोसळली. त्याचवेळी स्थानकातून पुढे जाणाऱ्या एसटी बसचे मागील चाक तिच्या अंगावरून गेले.
या भीषण अपघातात आकांक्षाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेमुळे ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेमुळे बसस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा तसेच गर्दीच्या नियोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, आपल्या मुलीचा डोळ्यांसमोर झालेला भीषण अपघात पाहून आकांक्षाच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला. त्या घटनास्थळीच भोवळ येऊन पडल्या. घटनेनंतर आकांक्षाच्या चुलत भावाने प्रसंगावधान राखत तिला तातडीने रिक्षातून नाशिक जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI