चंद्रपूर : अग्निवीर सैन्य भरतीसाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
चंद्रपूर, 7 सप्टेंबर (हिंस.) : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील उमेदवारांसाठी अग्निवीर सैन्य भरती रॅली 2 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेद
चंद्रपूर : अग्निवीर सैन्य भरतीसाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन


चंद्रपूर, 7 सप्टेंबर (हिंस.) : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील उमेदवारांसाठी अग्निवीर सैन्य भरती रॅली 2 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे. कोणत्याही सुविधेत कमतरता राहता कामा नये, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अग्निवीर सैन्य भरतीच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. व्यवहारे यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, पोलिस आणि राज्य परिवहन विभागासह सर्व संबंधित विभागांनी विसापूर येथील क्रीडा संकुल परिसराची संयुक्त पाहणी करावी. कोणत्या विभागाची कोणती जबाबदारी आहे आणि त्यासाठी कोणत्या विभागाशी समन्वय साधणे आवश्यक आहे, हे आधीच निश्चित करावे, असे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक दुरुस्ती तसेच विद्युतीकरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. ही कामे पूर्ण झाल्यानंतरच इतर कामे करता येणार असल्याने संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. कामात कोणतीही हयगय होऊ देऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हा परिषदेने उमेद आणि माविमच्या बचत गटांच्या माध्यमातून स्टेडियमच्या बाहेरील जागेत सशुल्क तत्त्वावर खाद्यपदार्थ व इतर आवश्यक वस्तूंचे स्टॉल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच उमेदवारांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.

महानगरपालिका व नगर परिषदेने स्टेडियम परिसरातील वाढलेले गवत आणि झुडपे काढून परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच उमेदवारांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत. राज्य परिवहन विभागाने उमेदवारांच्या ये-जा करण्यासाठी आवश्यक त्या बसची व्यवस्था करावी.

भरतीच्या कालावधीत अखंडित वीजपुरवठा राहील, याची दक्षता विद्युत विभागाने घ्यावी. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका, प्रथमोपचार साहित्य आणि डॉक्टरांचे पथक तैनात ठेवावे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने किमान 10 शिक्षकांची नियुक्ती करावी.

भरती प्रक्रियेदरम्यान साप तसेच इतर वन्यप्राण्यांपासून उमेदवारांना कोणतीही हानी होऊ नये, यासाठी वन विभागाने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे, अशा सूचनाही डॉ. व्यवहारे यांनी दिल्या.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे आदी उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande