चंद्रपूर : एसटीची कामगार चळवळ बदली-ड्युटी व ओटीपुरती मर्यादित; मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष : श्रीरंग बरगे
चंद्रपूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कामगार चळवळीचे स्वरूप सध्या बदली, बढती, ड्युटी आणि ओव्हरटाइमपुरते मर्यादित राहिले असून, बदललेल्या परिस्थितीचा एसटी महामंडळासह, कामगार चळवळीवरही विपरीत परिणाम झाला आहे
चंद्रपूर : एसटीची कामगार चळवळ बदली-ड्युटी व ओटीपुरती मर्यादित; मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष : श्रीरंग बरगे


चंद्रपूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कामगार चळवळीचे स्वरूप सध्या बदली, बढती, ड्युटी आणि ओव्हरटाइमपुरते मर्यादित राहिले असून, बदललेल्या परिस्थितीचा एसटी महामंडळासह, कामगार चळवळीवरही विपरीत परिणाम झाला आहे, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.

कर्मचाऱ्यांची देणी तसेच एसटी महामंडळाची सरकारकडून येणे असलेली वैधानिक देणी मिळविण्यासाठी व्यापक आंदोलन करण्याची गरज असताना, दुर्दैवाने त्यासाठी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचे बरगे यांनी सांगितले.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय,चंद्रपूर येथे झालेल्या एसटी कामगारांच्या मेळाव्यात कामगारांसमोर बरगे यांनी आपली भूमिका मांडली.

एसटीमध्ये पूर्वी, गोविंदराव आदिक ,भाऊ फाटक, जॉर्ज फर्नांडिस, भगवान भिंगारदेवे, साहेबराव घुगे, यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले नेते होते. गेल्या सात-आठ वर्षांतील आंदोलने पाहता दूरदृष्टी असलेले आणि धोरणात्मक विषय मांडणारे नेतृत्व कमी झाले असून, चळवळ ड्यूटी व ओटीसाठी काम करणाऱ्या काही ठराविक पुढाऱ्यांभोवती केंद्रित झाली आहे. त्यामुळे कामगारांचे व एसटी समोरील मूळ प्रश्न बाजूला पडल्याचे बरगे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रॅच्युइटी, वेतनवाढीच्या फरकाची रक्कम आणि महागाई भत्ता यांसह सुमारे ७,००० कोटी रुपयांची वैधानिक देणी थकीत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी योग्य दिशा, दूरदृष्टी व चांगले धोरण आखण्याची गरज असून दुर्दैवाने ते होत नसल्याची खंत सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

एसटीच्या उत्पन्नवाढीचे जवळपास सर्व पर्याय तोकडे पडत असून असून, ५,००० हून अधिक नवीन बसगाड्या दाखल झाल्यानंतरही महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नसल्याचा दावा बरगे यांनी केला.

या वेळी बल्लारपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, दिलीप माकोडे,संघटनेचे पदाधिकारी सी. पी. राठोड, विजय चंदनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande