
परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
पालम तालुक्यात पावसाच्या तुटीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तालुका 'दुष्काळग्रस्त' जाहीर करून सन 2026 च्या रब्बी पिकांचा विमा त्वरित अदा करावा, या मागणीचे निवेदन पालमचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांना देण्यात आले. पालम तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ३०% पेक्षा जास्त पावसाची तूट नोंदवली गेली आहे. तसेच, सप्टेंबर महिना सुरू होऊन आजमितीस सात दिवसांचा कालावधी उलटला तरी पावसाने पूर्णपणे ओढ दिलेली आहे. या सततच्या खंडामुळे पालम तालुक्यातील शेती पिकांचे अतोनात न भरून निघणारे नुकसान झाले आहे.सध्या शेतातील प्रमुख पिके (सोयाबीन, कापूस इत्यादी) फुलोरा व फळधारणेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. या काळात पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच निसर्गाने पाठ फिरवली आहे. यामुळेः सोयाबीनच्या फुलोऱ्यातील फुले गळून पडत आहेत आणि लागलेल्या शेंगा झाडावरच करपून जात आहेत. कापसाची पाती व बोंडे वाळून गळत असून झाडे सुकून माना टाकत आहेत. इतर सर्व खरीप पिके पाण्याअभावी डोळ्यांदेखत वाळत असल्याने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. भीषण परिस्थितीमुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर आगामी काळात तीव्र पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न संपूर्ण तालुक्यात निर्माण झाला आहे. तहसीलदार कार्यालयाने तात्काळ आपल्या अधिनस्त कृषी व महसूल कर्मचाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे १००% वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, पालम तालुक्यात तात्काळ 'दुष्काळसदृश परिस्थिती' घोषित करून त्या धर्तीवर सर्व शासकीय उपाययोजना लागू कराव्यात, पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबव्याव्या, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.निवेदनावेळी गोविंद लांडगे, विश्वनाथ शिंदे, शिरीष जाधव, मदन केंद्रे, सिताराम सूरनर, संतोष पैके, धिरज पवार, गोविंद तूरनर, रमाकांत सराफ आदि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis