धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सरकारला अल्टिमेटम
ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा सोलापूर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना या मागणीसाठी धनगर समाजाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सरकारला अल्टिमेटम


ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सोलापूर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना या मागणीसाठी धनगर समाजाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र व राज्य सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य, सोलापूर शहर-जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न ठेवता कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर निश्चित कालमर्यादेत त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

धनगर समाजाने आपल्या घटनात्मक हक्कांसाठी गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष केला आहे. सामाजिक न्याय, शैक्षणिक व आर्थिक प्रगती तसेच राजकीय प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे समाजाच्या वतीने नमूद करण्यात आले.

‘प्लॅन ए’नंतर ‘प्लॅन बी’ काय?

सरकारचा ‘प्लॅन ए’ अपयशी ठरल्यास ‘प्लॅन बी’ काय असेल, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी धनगर समाजाने केली आहे. केवळ न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून न राहता केंद्र व राज्य सरकारने आवश्यक कायदेशीर, प्रशासकीय आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

“आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने आता ठोस भूमिका जाहीर करावी. समाजाला केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी,” अशी भावना समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. सरकारने धनगर समाजाच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक समन्वय साधावा आणि निश्चित कालमर्यादेत अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, मागणीवर ठोस निर्णय न झाल्यास धनगर समाजाला पुन्हा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सरकार या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.

यावेळी अर्जुन सलगर, डॉ. अभिमन्यू टकले, अमोल कारंडे, राम वाकसे, उमेश कोळेकर, प्रा. देवेंद्र मदने, सदाशिव व्हनमाने, शरणू हंडे, राज बंडगर, अभिषेक भाईकट्टी, धनराज जानकर, आप्पा पुजारी, भिमा बंडगर, संदिप धायगुडे, रवी काळे, सुदर्शन खांडेकर, अजय रूपनर, रामभाऊ दुधाळ, सुजित कोकरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. यावेळी आरक्षणाच्या प्रश्नावर धनगर समाजाची एकजूट पुन्हा अधोरेखित झाली.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande