पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि ग्रामीण अर्थचक्रावर ताण
लातूर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : सप्टेंबर महिना म्हणजे गणेशोत्सव, गौरी-गणपती, पोळ्यानंतरचे विविध धार्मिक सण आणि उत्सवांची लगबग सुरू होण्याचा काळ. मात्र, यंदा पावसाची अनिश्चितता, पिकांचे झालेले नुकसान आणि ग्रामीण अर्थचक्रावर आलेला ताण यामुळे सणासुदीच्या
दुष्काळाचे सावट


लातूर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : सप्टेंबर महिना म्हणजे गणेशोत्सव, गौरी-गणपती, पोळ्यानंतरचे विविध धार्मिक सण आणि उत्सवांची लगबग सुरू होण्याचा काळ. मात्र, यंदा पावसाची अनिश्चितता, पिकांचे झालेले नुकसान आणि ग्रामीण अर्थचक्रावर आलेला ताण यामुळे सणासुदीच्या उत्साहावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील खरेदी-विक्रीवरही जाणवत आहे.

आर्थिक संकटाच्या परिस्थितीतही धार्मिक परंपरा आणि उत्सवांची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, यंदा मोठ्या खर्चाचे कार्यक्रम, सजावट आणि धामधूम टाळून साधेपणाने सण साजरे करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

गणेश मंडळांकडूनही परिस्थितीचा विचार करून सामाजिक उपक्रम, प्रबोधनपर कार्यक्रम तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवांमध्ये खर्चापेक्षा सामाजिक संदेशाला अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.

पावसाच्या लहरीपणाने शेतीचे गणित बिघडले

काही भागांत पिकांना पावसाची नितांत गरज असताना पावसाने दडी मारल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने सणासुदीचा खर्च भागविणेही अनेकांसाठी आव्हान ठरत आहे.

खरीप हंगामातील पिकांवर ग्रामीण अर्थव्यवस्थेची मोठी भिस्त असते. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खत-बियाणे, मजुरी, मशागत आणि इतर शेती खर्च वाढत असताना अपेक्षित उत्पादनाची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

‘वरुणराजाने कृपादृष्टी करावी’

सणासुदीच्या दिवसांत तरी वरुणराजाने कृपादृष्टी करावी आणि पिकांना जीवदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप पिकांना आधार मिळण्याबरोबरच ग्रामीण बाजारपेठेलाही चालना मिळू शकते.

त्यामुळे एकीकडे घराघरांत गणेशोत्सवाची तयारी सुरू असली, तरी दुसरीकडे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सणांचा उत्साह कायम असला तरी यंदा त्यावर आर्थिक संकटाची सावली स्पष्टपणे जाणवत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande