नांदेड : पिकांना ताणापासून वाचविण्यासाठी अष्टसूत्री उपाययोजनेचे आवाहन
नांदेड, 7 सप्टेंबर (हिंस.) : नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडानंतर सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेला आहे. त्यामुळे हलक्या मुरमाड व माळरानाच्या जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सोयाबीन, मूग आणि उडीद या कमी
नांदेड : पिकांना ताणापासून वाचविण्यासाठी अष्टसूत्री उपाययोजनेचे आवाहन


नांदेड, 7 सप्टेंबर (हिंस.) : नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडानंतर सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेला आहे. त्यामुळे हलक्या मुरमाड व माळरानाच्या जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सोयाबीन, मूग आणि उडीद या कमी कालावधीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कपाशी व तूर या दीर्घ कालावधीच्या पिकांवरही पाण्याच्या ताणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पावसाच्या खंड काळात पिकांवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

पिकांची वाढीची अवस्था आणि जमिनीतील उपलब्ध ओलावा यांचे नियमित निरीक्षण करावे. पिकांच्या गरजेनुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात. संवेदनशील अवस्थेतील पिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संरक्षित सिंचन द्यावे. त्यामुळे पिकांना पाण्याच्या ताणापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होईल.

कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सरी काढून भविष्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतात अडवून जमिनीत मुरविण्याचे नियोजन करावे. तसेच आंतरमशागती करून जमिनीतील भेगा बुजवाव्यात. यामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते.

तण नियंत्रणाला प्राधान्य

तणांमुळे पिकांसाठी उपलब्ध असलेला ओलावा आणि अन्नद्रव्यांचा वापर होतो. त्यामुळे पावसाच्या खंड काळात तण नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी तण नियंत्रणाच्या योग्य पद्धतींचा अवलंब करावा.

पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. जैविक निविष्ठांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कीड अधिक झाल्यानंतरच आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

जमिनीवर योग्य प्रकारचे आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा संरक्षित राहण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीनुसार आच्छादनाचा वापर करावा.

अन्नद्रव्यांची फवारणी

पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी करावी. यामध्ये पोटॅशियम नायट्रेट 1 ते 2 टक्के तसेच 00:50:34 हे अन्नद्रव्य 1 टक्का प्रमाणात दर 8 ते 10 दिवसांनी फवारावे. यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते.

तसेच बायो एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदी जैविक निविष्ठांचा वापर केल्यास पिकांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते.

पावसाच्या खंड काळात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, जमिनीतील ओलावा संवर्धन आणि पिकांच्या गरजेनुसार व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजनांचा अवलंब करून पिकांचे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande