गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचे व्यापक रूप; शासनाच्या सर्व विभागांचा सहभाग
उत्कृष्ट मंडळांना दीड कोटींची पारितोषिके ; पर्यावरणपूरक विसर्जनापासून आरोग्य,पर्यटन, महिला बचतगटांपर्यंत विविध उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचे व्यापक रूप


उत्कृष्ट मंडळांना दीड कोटींची पारितोषिके ; पर्यावरणपूरक विसर्जनापासून आरोग्य,पर्यटन, महिला बचतगटांपर्यंत विविध उपक्रम

छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य सरकारने यंदा सर्व शासकीय विभागांना या उत्सवाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. गावपातळीपासून शहरांपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम,पर्यावरण संवर्धन,स्वच्छता,आरोग्य,पर्यटन, महिला सक्षमीकरण,स्थानिक उद्योग-व्यवसाय,कृषी,शिक्षण आणि सामाजिक प्रबोधन अशा विविध अंगांनी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.यासंदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १७ ऑगस्ट रोजी सर्वसमावेशक असा शासन निर्णय जारी केला आहे.

राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सवाला विशेष स्थान असून,या उत्सवाने महाराष्ट्राची देश-विदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे.गणेशोत्सवाच्या काळात पर्यटनाबरोबरच त्यावर आधारित उद्योग आणि व्यवसायांना चालना मिळून सामाजिक,सांस्कृतिक व आर्थिक अभिसरण घडते.ही परंपरा जपण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देण्यात आला आहे.राज्याचा हा महोत्सव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळविण्याच्या दृष्टीने गावापासून शहरापर्यंत विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी दीड कोटींची पारितोषिके

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर गौरविण्यात येणार आहे.राज्यातील सुमारे ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुमारे दीड कोटी रुपयांची पारितोषिके वितरित करण्याचे नियोजन आहे.राज्य व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ अकादमीमार्फत होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यस्तरीय व्याख्यानमाला आयोजित करण्याबरोबरच राज्यातील प्रमुख गणेश मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांचे ऑनलाइन दर्शन घडविण्यासाठी स्वतंत्र पोर्टल उभारले जाणार आहे.घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रे अपलोड करण्यासाठी डिजिटल व्यासपीठही विकसित केले जाणार आहे. गणेशोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत सांस्कृतिक कार्यक्रम,महाराष्ट्राबाहेरील १० राज्यांत,तसेच भारताबाहेरील एका देशात कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.नवी दिल्लीत पाच दिवस आणि मुंबईत आठ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

‘गणपती रील्स’ स्पर्धाही

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.राज्यभरातून गणपतीविषयक ‘रील्स’ स्पर्धा महसूल विभागीय आणि राज्यस्तरावर घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा आणि प्रथांचे उत्तम चित्रण करणाऱ्या मराठी चित्रपटांचाही गौरव केला जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांवर उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी तालुका व जिल्हास्तरीय समित्या स्थापन करणे,अर्जांची प्रत्यक्ष भेटीद्वारे तपासणी,गुणांकन आणि अंतिम निकाल अकादमीकडे पाठविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.शहरातील प्रमुख ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, विसर्जन मिरवणुकांचे संयोजन आणि समन्वय तसेच सर्व कार्यक्रमांचे स्थानिक स्तरावर नियंत्रण,समन्वय,प्रचार आणि प्रसिद्धी करण्याची जबाबदारीही जिल्हा प्रशासनाकडे असेल.

पर्यावरणपूरक उत्सवावर विशेष भर

राज्य महोत्सवाचे स्वरूप देताना पर्यावरण संरक्षणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता,वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव राबविण्यात येणार आहे.ग्रामीण भागात पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्याच्या सूचना आहेत. मूर्ती विसर्जनामुळे जलस्रोत अडणार नाहीत याची दक्षता घेण्याबरोबरच जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. पर्यावरण विभागामार्फत शाडूच्या मूर्ती,बीज गणपती,निर्माल्य संकलन व पुनर्वापर आणि प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवासाठी राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिका,नगरपालिका आणि नगरपंचायतींनाही नगरस्वच्छता,वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाबरोबरच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बचतगट,शेतकरी आणि स्थानिक कारागिरांनाही संधी

गणेशोत्सवाच्या अर्थकारणाचा लाभ स्थानिक घटकांपर्यंत पोहोचविण्यावरही शासनाने भर दिला आहे.स्थानिक शेतकऱ्यांच्या सहभागातून दुर्वा,फुले,नैवेद्य साहित्य,सेंद्रिय कृषी उत्पादने आणि पारंपरिक कृषी संस्कृतीची माहिती प्रसारित केली जाणार आहे.महिला बचतगट व सहकारी संस्थांना मोदक,प्रसाद साहित्य आणि स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.गणेशमूर्ती,मखर,सजावट व पूजासाहित्य तयार करणाऱ्या सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांतील कारागिरांसाठीही प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिला बचतगटांच्या उत्पादन प्रदर्शनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच महिला आणि बालकांसाठी गणेश संस्कार शिबिरे,मोदक स्पर्धांसारखे कल्पक उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाला देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी ‘गणेश आणि विज्ञान

महाविद्यालयांमध्ये ‘गणेश आणि विज्ञान’ या विषयावर परिसंवाद, व्याख्याने आणि नवोपक्रम प्रदर्शने आयोजित केली जाणार आहेत. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मदतीने मंडळांसाठी नावीन्यपूर्ण रोबोटिक्स देखावे उभारण्यास तसेच ‘इको-फ्रेंडली डेकोरेशनबाबत जनजागृती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.शाळांमध्ये गणेशोत्सवापूर्वी शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळा,तर गणेशोत्सवाचा इतिहास आणि सामाजिक भान या विषयांवर निबंध,वक्तृत्व आणि सांस्कृतिक उपक्रम घेतले जाणार आहेत.

गर्दीच्या ठिकाणी आरोग्य तपासणी, रक्तदान व ‘सीपीआर’ प्रशिक्षण

गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्दीच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी,रक्तदान शिबिरे आणि हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचारासाठी ‘सीपीआर’ प्रशिक्षणाला प्रोत्साहन द्यायचे आहे.वैद्यकीय मदत केंद्र आणि आरोग्य मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.प्रसाद व खाद्यपदार्थांच्या अन्नसुरक्षेसाठी तपासणी,जनजागृती आणि भेसळ प्रतिबंध मोहिमाही राबविण्यात येणार आहे.

दिव्यांगांसाठी सुलभ दर्शन

गणेशोत्सव अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प,व्हीलचेअर, सांकेतिक भाषेतील आरती, स्पर्शदर्शन आणि सुलभ प्रवेशाच्या व्यवस्थेला प्रोत्साहन दिले जाणार आहे.विसर्जन मार्ग सुव्यवस्थित ठेवणे,शासकीय इमारती आणि महत्त्वाच्या ठिकाणी प्रकाशयोजना करणे तसेच पोलिसांच्या समन्वयाने दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग आणि सुरक्षित पादचारी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या इतिहास,परंपरा, अष्टविनायक,पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि शासनाच्या उपक्रमांची माहिती माहितीपत्रके, दृकश्राव्य माध्यमे आणि समाजमाध्यमांवरील जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

राज्य महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांच्या समन्वयाची जबाबदारी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालकांकडे देण्यात आली असून,विविध मंत्रालयीन विभाग व कार्यालयांमार्फत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समन्वयासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.संबंधित सर्व विभागांनी शासन निर्णयातील कार्यक्रम व उपक्रम यशस्वीपणे राबवावेत,असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande