लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा धडाका; ४,७३४ दुचाकीस्वारांवर कारवाई
लातूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांमधील जीवितहानी रोखण्यासाठी लातूर पोलीस विभागाने १ सप्टेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात हेल्मेट न वापरणाऱ्या ४ हजार
हेल्मेट  सक्ती


लातूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांमधील जीवितहानी रोखण्यासाठी लातूर पोलीस विभागाने १ सप्टेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात हेल्मेट न वापरणाऱ्या ४ हजार ७३४ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. शंभर टक्के हेल्मेट वापराचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील २३ पोलीस ठाणी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून हेल्मेट वापराबाबत तपासणी केली जात आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात दुचाकीस्वारांकडून हेल्मेट वापराचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मोहिमेनंतर पहिल्याच आठवड्यात हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कारवाईसोबतच दुचाकीस्वारांना हेल्मेटच्या वापराचे महत्त्व पटवून देत जनजागृतीही करण्यात येत आहे.

दंडापेक्षा जीव वाचविण्यावर भर

हेल्मेट सक्तीचा उद्देश दंड वसूल करणे नसून अपघातांमध्ये होणारी जीवितहानी रोखणे हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका कमी करण्यासाठी हेल्मेट महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. विशेष म्हणजे, तपासणीदरम्यान हेल्मेट नसलेल्या नागरिकांना जागेवरच हेल्मेट उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित ठिकाणी हेल्मेट विक्रेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या दुचाकीस्वाराने जागेवरच हेल्मेट खरेदी करून ते परिधान केले, तर त्याला दंड न करता हेल्मेट वापरण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.

शंभर टक्के हेल्मेट वापराचे उद्दिष्ट

जिल्ह्यातील प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरण्यास सुरुवात करेपर्यंत कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईची वाट न पाहता स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. “हेल्मेट घाला, सुरक्षित राहा” या संदेशातून नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन सुरक्षित वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे लातूर पोलीस विभागाने आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande