पाथरी साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती द्या - आ. राजेश विटेकर
परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)। पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा सुधारित प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा तसेच प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजेश उत्तमराव विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव
पाथरी साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती द्या - आ. राजेश विटेकर


परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा सुधारित प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा तसेच प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजेश उत्तमराव विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पाथरी साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास नियोजन विभागाच्या ३० नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार ९१ कोटी ८० लाख ९४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या आराखड्यांतर्गत विविध कामांसाठी आतापर्यंत ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.दरम्यान, तत्कालीन उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांनी २६ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत पंढरपूर, देहू व आळंदीच्या धर्तीवर पाथरीतील विकासकामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी मुंबई अथवा पुणे येथील अनुभवी आर्किटेक्टकडून आराखड्याचे परीक्षण करून सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मे २०२५ रोजी नगर परिषदेला पुढील आदेशापर्यंत काम थांबविण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी २२ जून २०२६ रोजी दिलेल्या माहितीनुसार, जमीन अधिग्रहणासाठी संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून त्यासाठी २७.०१५ लाख रुपये खर्च झाले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भूसंपादनाची कार्यवाहीही प्रगतीपथावर आहे. मात्र, पाथरी नगर परिषदेकडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी आणि पूर्णवेळ तांत्रिक अभियंता उपलब्ध नसल्याने एवढ्या मोठ्या विकास आराखड्याची तांत्रिक प्रक्रिया हाताळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच बैठकीतील निर्देशांना बराच कालावधी उलटूनही सुधारित आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झालेला नसल्याने शासनस्तरावरील मंजुरीची प्रक्रिया रखडल्याचे आमदार विटेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. नगर परिषदेच्या निधीतील गैरव्यवहाराबाबत अनेक तक्रारी झाल्याचा दावा करत, नगर परिषदेत सत्ताधारी गटाकडे बहुमत नसल्याने आवश्यक ठरावांना मंजुरी मिळत नसल्यानेही विकास आराखडा रखडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. विकासकामांची जबाबदारी PWDकडे देण्याची मागणी नगर परिषदेच्या तांत्रिक मर्यादा लक्षात घेता, विकास आराखड्याच्या कामांना गती देण्यासाठी व कामांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा विशेष प्राधिकरणाकडे कामाची जबाबदारी सोपविण्याबाबत विचार करावा, अशी मागणीही आमदार विटेकर यांनी केली आहे. सुधारित वाढीव निधीचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होताच त्यास तातडीने प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात यावी. पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असून देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकासाचे हे महत्त्वाकांक्षी काम अधिक काळ प्रलंबित न ठेवता कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा आमदार विटेकर यांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande