
महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची ३७२ कोटींची उलाढाल
शिरूर अनंतपाळ येथे ग्राहक संवाद बैठक
लातूर, ७ सप्टेंबर (हिं.स.) : ग्राहक आणि सभासदांचा विश्वास संपादन करून महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेने आर्थिकदृष्ट्या सक्षम वाटचाल केली आहे. ३४ कोटी रुपयांचे भागभांडवल आणि ११ हजार सभासद-ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर बँकेने ३७२ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून एमएनएस बँकेने यापुढेही यशस्वी वाटचाल करावी, असे प्रतिपादन बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
शिरूर अनंतपाळ येथील महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या शाखेच्या वतीने आयोजित ग्राहक संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक अतुल माने, स्थायी समितीचे सदस्य बालाजी येरलमलवार, सिद्धलिंग शिवणे, भरत दुरुगकर, रामचंद्र देवशेटवार, अमोल शिंदे, प्रा. मोहनराव भोसले, मुक्तार तांबोळी, शिवहार संभाळे, प्रभारी कार्यकारी संचालक नितीन सराफ, बापूसाहेब गोरे, शाखा व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी, अमोल पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.
कव्हेकर म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. फोन-पे, गुगल-पे, आरटीजीएस यांसारख्या डिजिटल सुविधांसह भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि बँकेच्या सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, प्रभारी कार्यकारी संचालक नितीन सराफ यांनी बँकेच्या विविध सुविधांची माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी ९.५ टक्के व्याजदराने गोल्ड लोनची सुविधा उपलब्ध असून, होम लोन तसेच अन्य कर्जप्रकरणे जलदगतीने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देतानाच बँकेच्या चौफेर प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही सराफ यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन सराफ यांनी केले. सूत्रसंचालन व आभार शाखा व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांनी मानले. ग्राहक संवाद बैठकीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis