
छत्रपती संभाजीनगर, 7 सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच शाळा व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवावा. तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांच्यासह आरोग्य, शिक्षण, पोलिस आणि अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, शाळा व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी काटेकोर दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील प्रतिबंधाची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रत्येक शाळेने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेसाठी निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करावी. यासाठी शिक्षण विभागासह संबंधित यंत्रणांनी नियमित कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
COTPA अंतर्गत नियमित कारवाई
सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम (COTPA-2003) अंतर्गत कारवाई करण्यासाठी पथके सक्रिय करावीत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई करावी. तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष जाहिराती आणि प्रायोजकत्वासंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कठोर कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
विद्यार्थी, युवकांमध्ये जनजागृती
ग्रामपंचायती, शाळा-महाविद्यालये आणि विविध शासकीय विभागांच्या सहभागातून तंबाखूविरोधी जनजागृती अधिक व्यापक करावी. विशेषतः विद्यार्थी आणि युवकांना तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी प्रभावी उपक्रम राबवावेत, असेही जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट केले.
बैठकीत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध विभागांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडे सादर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis