
पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि एमपीएससी अध्यक्षांच्या राजीन्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी ओंकारेश्वर मंदिर चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
मोर्चाला संबोधित करताना आमदार रोहित पवार म्हणाले, “हा लढा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. एमपीएससी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःहून तातडीने राजीनामा द्यावा. अन्यथा पुढील आंदोलन नवी पेठेतील अहिल्या अभ्यासिकेसमोर करण्यात येईल.”
परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक होण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.
एमपीएससी विद्यार्थिनी सायली साळुंखे म्हणाल्या, “सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एमपीएससी गट-क परीक्षेला सुमारे १२ लाख विद्यार्थी बसणार आहेत. त्यामुळे ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.”
या मोर्चात आमदार विश्वजित कदम, शिक्षक प्रतिनिधी विठ्ठल कांगणे, सचिन ढवळे, विद्यार्थी प्रतिनिधी किरण निंभोरे यांच्यासह मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु