
सोलापूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
सोलापूर महानगरपालिकेच्या नव्या स्वीकृत नगरसेवक पदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असतानाही, पक्षांतर्गत राजकीय समीकरणे आणि दोन आमदारांमधील कथित शीतयुद्धामुळे एक स्वीकृत नगरसेवक पद अद्याप रिक्त ठेवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या प्रशिक्षण अभियानात नागेश सरगम यांची झालेली उपस्थिती या रिक्त पदाच्या चर्चेला नवा धक्का देणारी ठरली आहे.
महानगरपालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. त्यापैकी बहुतांश पदांवर नियुक्त्या झाल्यानंतरही एक पद का रिक्त ठेवण्यात आले? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू होते. पक्षातील इच्छुकांची संख्या, स्थानिक राजकीय समीकरणे आणि दोन आमदारांच्या गटांमधील मतभेद यामुळे हे पद प्रलंबित असल्याची चर्चा होती.
दरम्यान, भाजपच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानांतर्गत रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणासाठी नगरसेवकांनाच प्रवेश असल्याची चर्चा असताना नागेश सरगम यांची या कार्यक्रमातील उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.
नागेश सरगम हे या प्रशिक्षण कार्यक्रमात नेमक्या कोणत्या भूमिकेत सहभागी झाले, हा प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांच्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढला जात आहे. जर ते अद्याप अधिकृत स्वीकृत नगरसेवक नसतील, तर पक्षाच्या महत्त्वाच्या नगरसेवक प्रशिक्षणात त्यांची उपस्थिती का? असा सवाल आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
यामुळेच सोलापूर भाजपच्या राजकीय वर्तुळात नवव्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी नागेश सरगम यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी प्रशिक्षण कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती ही आगामी नियुक्तीची पूर्वतयारी असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
पक्षांतर्गत समीकरणांचा तिढा सुटला?
एक स्वीकृत नगरसेवक पद रिक्त ठेवण्यामागे नेमकी कोणती राजकीय गणिते होती आणि आता ती गणिते कशी जुळवण्यात आली, याबाबतही उत्सुकता वाढली आहे. दोन आमदारांच्या गटांमध्ये सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीतून हे पद रखडल्याची चर्चा होती. त्यामुळे सरगम यांच्या नावावर सहमती झाली असेल तर भाजपमधील अंतर्गत तिढा सुटल्याचे संकेत मानले जात आहेत.
नागेश सरगम यांच्या प्रशिक्षणातील उपस्थितीने या चर्चेला अधिकच बळ मिळाले असून, आता अधिकृत नियुक्तीची घोषणा कधी होते, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच नाव समोर आल्याने नवव्या स्वीकृत नगरसेवकपदाचे कोडे सुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता नागेश सरगम यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब कधी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड