
नाशिक, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
: ऊन वारा, थंडी पाऊस यांची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते आपली सकाळ प्रसन्न करतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जगण्याचा संदेश देणारे आणि प्रत्येकात आशावाद निर्माण करणारे वृत्तपत्र विक्रेते हे केवळ व्यावसायिक नसून आपल्या कुटुंबाचे खरे सोबती आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने श्रमसेवी अक्षरदूतांचा म्हणजेच वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञता सोहळा श्री.बोरस्ते यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत सावळीराम तिदमे होते.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या 'पुस्तकावर बोलू काही' उपक्रमाचा ३००वा भाग पूर्ण झाल्याबद्दल नाशिकरोड, नवीन नाशिक, मध्य नाशिक, सातपूर आदी भागातील ३०० अक्षरदूतांचा (वृत्तपत्र विक्रेत्यांचा) सन्मान करण्यात आला.
आजपर्यंत या उपक्रमात सहभागी झालेल्या ३०० साहित्यिकांबरोबरच या उपक्रमातून मिळालेल्या मौलिक माहितीबद्दल रसिकांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्र.द.कुलकर्णी, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, नाशिक मध्य वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, नवीन नाशिक वृत्तपत्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी ठाकरे, सातपूर वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष राजू अनमोल आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनीही आपल्या मनोगतात सामाजिक जडणघडणीत वृत्तपत्रांचे आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
'पुस्तकावर बोलू काही' उपक्रमाचे ३००वे पुष्प सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनी 'पुस्तकानुभव' या ग्रंथाच्या माध्यमातून गुंफले. आपल्या मनोगतात त्यांनी १७व्या शतकापासून आजपर्यंतच्या पुस्तकांच्या प्रवासाची सांगड घालत पुस्तक आणि समाजाचा अनुबंध, पालकत्वावरील प्राचीन ग्रंथ आणि मराठी व्याकरण या सर्व संदर्भातून मराठी ग्रंथसंपदेची श्रीमंती नव्याने उलगडली. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.जी.वाघ होते. कामगारनेते प्रशांत कापसे आणि राजेंद्र अहिरराव यांना ग्रंथभेट देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI