पूर्णा शहरात रोडरोमिओंवर पोलिसांची नजर
परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील शाळा, विद्यालये, महाविद्यालय, ग्रंथालये तसेच खासगी क्लासेसच्या परिसरात रोडरोमिओगिरी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पूर्णा पोलिसांनी दामिनी पथक कार्यरत केले आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकड
पूर्णा शहरात रोडरोमिओंवर पोलिसांची नजर पूर्णा/प्रतिनिधी


परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

शहरातील शाळा, विद्यालये, महाविद्यालय, ग्रंथालये तसेच खासगी क्लासेसच्या परिसरात रोडरोमिओगिरी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पूर्णा पोलिसांनी दामिनी पथक कार्यरत केले आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून परिसरात विशेष गस्त घालण्यात येत असून, साध्या गणवेशातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विनाकारण थांबणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, छेडछाड करणे अथवा अश्लील शेरेबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांची विशेष नजर आहे. रोडरोमिओ आढळून आल्यास संबंधित तरुणाला तसेच त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज व ताकीद देण्यात येत आहे. यासोबतच पोलिसांकडून शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास अथवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास विद्यार्थिनींनी व नागरिकांनी पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांनी संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.ही विशेष मोहीम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत आहे. रोडरोमिओगिरी करणाऱ्यांना प्रथम समज व ताकीद देण्यात येत असून, त्यानंतरही गैरप्रकार सुरूच राहिल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande