
रत्नागिरी, 7 सप्टेंबर (हिं.स.) । दाभोळे (ता. संगमेश्वर) बाजारपेठेतील मुस्लिम मोहल्ला परिसरात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोठा अजगर आढळला. शरीफ साटविलकर यांच्या घरातील महिलेला हा अजगर दिसला. महिलेने आरडाओरडा केल्यामुळे शेजारील ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी जमा झाले.
अजगर सुरक्षित ठिकाणी राहावा आणि तो इतरत्र निघून जाऊ नये म्हणून अब्दुल लांजेकर व इतर ग्रामस्थांनी जवळपास दोन तास त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवले होते. दरम्यान ही माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली.
माहिती मिळताच संगमेश्वरचे वनक्षेत्रपाल सागर गोसावी यांनी दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे यांना तात्काळ सूचना दिल्या. त्यानुसार डॉ. प्रीतेश आडव आणि सहाय्यक सुयोग भेरे घटनास्थळी दाखल झाले.
वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने अजगराला सुरक्षितपणे पकडले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या कार्यवाहीमुळे एक मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी आणि घरातील लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी