
रत्नागिरी, 7 सप्टेंबर (हिं.स.) । युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध कोकणातील ग्रामीण भागासाठी शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार दोन घरगुती एलपीजी रिफिल सिलिंडरच्या बुकिंगमधील किमान कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोकणातील ग्रामीण भागातील घरगुती गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर ४५ दिवसांची अट लागू झाल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर स्वयंपाकाच्या इंधनाचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः एकत्र कुटुंब पद्धती, कुटुंबातील सदस्यांची अधिक संख्या आणि ग्रामीण भागातील दैनंदिन वापराचे प्रमाण लक्षात घेता एका सिलिंडरवर ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण करणे अनेक कुटुंबांसाठी अडचणीचे ठरत होते. त्यामुळे ही अट शिथिल करण्याची मागणी ग्रामीण भागातून सातत्याने होत होती.
याच पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवाचा विचार करून आमदार प्रमोद जठार यांनी संबंधित प्रशासन, जिल्हाधिकारी, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल विपणन कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे यांसह राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आणि कुटुंबीय कोकणातील आपल्या मूळ गावी दाखल होतात. त्यामुळे या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण ग्राहकांसाठी सिलिंडर बुकिंगवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी आमदार जठार यांनी केली होती.
या पाठपुराव्याला यश आले असून आता दोन रिफिल सिलिंडरच्या बुकिंगमधील अंतर ४५ दिवसांऐवजी २५ दिवस करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील ग्रामीण भागात वाढणाऱ्या एलपीजीच्या मागणीची पूर्तता करण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामीण कुटुंबांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी होणाऱ्या अडचणीही काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडर पुरवठ्याबाबत शिथिल करण्यात आलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागातून स्वागत होत आहे. आमदार प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोकणातील हजारो घरगुती एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी