
नांदेड, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
युजीसी-नेट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET-2026) दि. ९ व १० सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयॉन डिजिटल झोन आयडीझेड, विष्णुपुरी, नांदेड या परीक्षा केंद्रावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत, शांततापूर्ण आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक, नांदेड डॉ. निलाभ रोहन यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार दि. ९ व १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत परीक्षा केंद्रापासून ३०० मीटर परिसरात परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.
या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ३०० मीटर परिसरातील सार्वजनिक दूरध्वनी, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, प्रतिकृती यंत्र (फॅक्स), छायाप्रत यंत्र (झेरॉक्स), संदेशयंत्र (पेजर) तसेच ध्वनिक्षेपक यांचा वापर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस गणकयंत्र, रेडिओ, संगणक, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) किंवा तत्सम साहित्य घेऊन जाण्यास अथवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्र परिसरात कोणताही गैरप्रकार, अनुचित प्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच परीक्षार्थींना शांततापूर्ण वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
परीक्षार्थी, पालक, नागरिक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis