‘जीवनदूतां’च्या धैर्याला रायगडमध्ये सलाम
आपत्तीच्या काळातील सेवाभावी कार्याचा गौरव रायगड, ७ सप्टेंबर (हिं.स.) : अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी तसेच अन्य आपत्तीच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतां’चे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या धैर्य
Safety over speed; life is more important than haste: Gogawale


Safety over speed; life is more important than haste: Gogawale


आपत्तीच्या काळातील सेवाभावी कार्याचा गौरव

रायगड, ७ सप्टेंबर (हिं.स.) : अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी तसेच अन्य आपत्तीच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतां’चे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या धैर्याचा आणि सेवाभावाचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.

रायगड पोलिसांच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत कुरुळ येथील आर.सी.एफ. सभागृहात ‘जीवनदूत सन्मान सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री गोगावले बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, रिलायन्स ग्रुपचे शशांक गोयल यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि विविध रेस्क्यू पथकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन गोगावले यांनी केले.

रस्ते अपघातांच्या वेळी तातडीने बचावकार्य सुरू करता यावे, यासाठी रेस्क्यू पथकांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांच्या सीएसआर निधीतूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वेगापेक्षा सुरक्षा महत्त्वाची, स्टाईलपेक्षा हेल्मेट महत्त्वाचे आणि घाईपेक्षा जीवन महत्त्वाचे, असे सांगत गोगावले यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, महामार्गावरील अपघात आणि औद्योगिक दुर्घटनांच्या वेळी विविध रेस्क्यू पथकांनी धैर्याने काम करून प्रशासनाला मोठी साथ दिल्याचे सांगितले.

यावेळी हेल्प फाउंडेशन, शेलार मामा रेस्क्यू, संघर्ष एक समाज सेवेसाठी, फ्लाइंग बर्ड्स श्रीवर्धन, सह्याद्री वन्यजीव पथक, एलअँडटी कन्स्ट्रक्शन रेस्क्यू टीम, नेरळ-माथेरान रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू, महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच महाड परिसरातील रेस्क्यू पथकांसह विविध सेवाभावी संस्थांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, रिलायन्स फाउंडेशनच्या नागोठणे सीएसआर निधीतून रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला बचाव नौका आणि बचाव साहित्य किट सुपूर्त करण्यात आले. या साहित्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी बचावकार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande