विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष उपक्रम
पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि स्वतःचे मत मांडण्याचा आत्मविश्वास विकसित व्हावा, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाक
ZP pune


पुणे, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि स्वतःचे मत मांडण्याचा आत्मविश्वास विकसित व्हावा, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ८ सप्टेंबरपर्यंत विशेष वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या विश्वाशी जोडण्याचा तसेच वाचनाकडे आनंददायी आणि सर्जनशील उपक्रम म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या अभियानांतर्गत शिक्षण विभागातील अधिकारी विविध शाळांना भेटी देत असून, विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष वाचन करत आहेत. केवळ पुस्तकातील मजकूर वाचण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता, वाचनानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यांनी वाचलेल्या मजकुराबाबत प्रश्न विचारणे, त्यांची मते जाणून घेणे आणि विषयावर चर्चा घडवून आणणे, यावर विशेष भर देण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त ८ सप्टेंबर रोजी जिल्हाभर ‘DEAR – Drop Everything And Read’ अर्थात ‘सर्व कामे बाजूला ठेवून वाचन करा’ या सामूहिक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांसह शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये हा उपक्रम एकाच वेळी राबविण्यात येणार असून, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि समुदायातील सदस्य सुमारे अर्धा तास सामूहिकरीत्या वाचन करणार आहेत.

वाचन म्हणजे केवळ शब्द आणि वाक्ये ओळखणे नव्हे, तर त्यातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती, आकलन क्षमता आणि अभिव्यक्ती विकसित होणे आवश्यक आहे, या भूमिकेतून या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. कथा किंवा अन्य साहित्य वाचल्यानंतर त्यातील आशयावर चर्चा करणे, पात्रांबाबत किंवा घटनांबाबत स्वतःचे मत व्यक्त करणे, प्रश्न उपस्थित करणे तसेच वाचलेल्या विषयाचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांशी जोडणे, अशा सहभागात्मक पद्धतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी केवळ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नव्हे, तर आनंदाने आणि उत्सुकतेने नाते जोडावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नियमित वाचनाची सवय लागल्यास विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांसोबतच त्यांच्या कल्पनाशक्ती, चिकित्सक विचार करण्याची क्षमता आणि आत्मविश्वासालाही चालना मिळू शकते. त्यामुळे वाचन संस्कृती रुजविण्यासाठी शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande