
नांदेड, 7 सप्टेंबर (हिं.स.) : नांदेड जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी 10 ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने या विशेष मोहिमेचे नियोजन केले आहे. या मोहिमेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
या विशेष मोहिमेंतर्गत प्रत्येक महसूल मंडळात संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिराचा दिनांक, वेळ आणि ठिकाण याची माहिती नागरिकांना वेळेत मिळावी, यासाठी गावपातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायतीच्या नोटीस फलकावर सूचना प्रसिद्ध करणे तसेच स्थानिक व्हॉट्सॲप समूहांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिबिरात कोणत्या सुविधा मिळणार ?
विशेष शिबिरांमध्ये जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करणे आणि नवीन अर्ज स्वीकारणे, अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव तसेच परिपूर्ण अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र जलदगतीने मिळावे, यासाठी संबंधित स्तरावर आवश्यक पाठपुरावाही केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत आवश्यक ती मदत शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
दैनिक संनियंत्रणाची व्यवस्था
शिबिरांच्या कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्यासाठी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून शिबिरांच्या कामकाजाचे दैनिक संनियंत्रण करण्यात येणार आहे.ही मोहीम शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याची बाब असून, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आपल्या स्तरावर तात्काळ सूक्ष्म नियोजन करून आदेशाची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी आपल्या क्षेत्रातील महसूल मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांना भेट देऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis