परभणीत दुष्काळाची दहीहंडी फोडत स्वाभिमानीचा एल्गार
परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘दुष्काळाची दहीहंडी’ फोडत सरकारचा नि
दुष्काळाची दहीहंडी फोडत स्वाभिमानीचा एल्गार


परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘दुष्काळाची दहीहंडी’ फोडत सरकारचा निषेध केला.

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागातील पिके सुकून गेली आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी सुकलेले पीक जिल्हाधिकाऱ्यांना भेट म्हणून देत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, प्रसाद गरुड, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोंढे, विठ्ठल चौखट, किशन शिंदे, कलिस भाई, रणजित चव्हाण आदींसहीत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande