
महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम
यवतमाळ, ७ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. बँकेतील सत्तेची चावी आपल्या हातात ठेवण्यासाठी महायुतीतील शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांमध्ये जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, सलग बैठका होऊनही जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे चित्र आहे.
महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची विश्राम भवन येथे बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच खासदार संजय देशमुख उपस्थित होते. बँकेतील मतदारसंघनिहाय जागा, इच्छुकांची संख्या आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्येक पक्षाकडून जागांवर दावा केला जात असल्याने अंतिम तोडगा निघू शकला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
यानंतर ६ सप्टेंबर रोजी धामणगाव मार्गावरील एका खासगी हॉटेलमध्ये पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील काही माजी संचालकांची बैठक झाली. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न किती गंभीर आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय पक्षांकडे आता चर्चेसाठी फारसा वेळ उरलेला नाही. आजपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होत असल्याने जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्षांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
काँग्रेससोबतही चर्चेच्या फेऱ्या
महायुतीतील जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नसतानाच शिंदेसेना आणि काँग्रेसमध्येही संभाव्य आघाडीच्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारंपरिक राजकीय समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र दाखल करणे : ७ ते ११ सप्टेंबर
नामनिर्देशनपत्रांची छाननी : १५ सप्टेंबर
पात्र नामनिर्देशनपत्रांची यादी : १६ सप्टेंबर
नामनिर्देशनपत्रे मागे घेणे : १६ ते ३० सप्टेंबर
मतदान : ११ ऑक्टोबर
मतमोजणी : १२ ऑक्टोबर
जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच, तसेच काँग्रेससोबत सुरू झालेल्या संभाव्य आघाडीच्या चर्चांमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी