
अमरावती, 07 सप्टेंबर (हिं.स.)
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्याच्या जंगल परिसरात गेल्या चार दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघिणीने अखेर शिरसगाव कसबा येथे वनविभागाच्या पिंजऱ्यात अखेरची विश्रांती घेतली. भांबोऱ्यापासून सुरू झालेला तिचा हा रक्तरंजित प्रवास तीन मानवी बळी आणि असंख्य जनावरांचा बळी घेऊन थांबला.या नरभक्षक वाघिणीच्या हल्ल्याची सुरुवात मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथून झाली. येथे शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला करून वाघिणीने पहिला बळी घेतला.या घटनेनंतर वाघिणीने मोर्शी तालुक्यातीलच रिद्धपूर गाठले. तेथे एका शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला चढवून तिला जागीच ठार केले.दुसऱ्या दिवशी वाघिणीने चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी गाव गाठले. सकाळी एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ठार केल्या, तर एक शेळी गंभीर जखमी झाली. वनविभागाची टीम सोनोरीत शोधमोहीम राबवत असतानाच, सायंकाळी साडेपाच वाजता सोनोरी येथील २२ वर्षीय तरुणी उर्मिला ही शेतात गवत कापत असताना वाघिणीने तिच्यावर हल्ला करून तिला फरफटत नेले. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत वनविभागाच्या वाहनांची तोडफोड केली. पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त तैनात करण्यात आला.काल सायंकाळी पुन्हा या वाघिणीने चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे एका मुलीचा बळी घेतला. सोनोरीतील घटना घडल्यानंतर काही तासांतच वाघिणीने थेट काजळी देऊरवाडा गाठत तेथील एका गायीला ठार केले. त्यानंतर लगेचच शिरसगाव कसबा येथे एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याचाही बळी घेतला आणि तिथेच दबा धरून बसली.सलग तीन मानवी बळी आणि जनावरांच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, तज्ज्ञांच्या पथकाने शिरसगाव कसबा येथे वाघिणीला ट्रँक्विलायझर (बेशुद्धीचे इंजेक्शन) मारून बेशुद्ध केले आणि पिंजऱ्यात जेरबंद केले.गेल्या काही दिवसांपासून परिसरात दहशत माजविणाऱ्या या वाघिणीला पकडण्यात जिल्ह्यातील वनविभागाच्या पथकाला सुरुवातीला यश आलं नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी पुणे येथील वन विभागाचे पथक चांदूरबाजार परिसरात दाखल झालं. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या वाघिणीला पकडण्यात वन विभागाला यश मिळालं आहे. पुण्याहून आलेल्या वनविभागाच्या पथकासह अमरावती वन विभागाच्या पथकानं या वाघिणीला शिरजगाव कसबा येथील शेत शिवारातून जेरबंद केलं.या वाघिणीने चार दिवसांत तीन गावांमध्ये तीन मानवी बळी घेतले असून, पाच ते सहा जनावरे ठार केली आहेत.
नरभक्षक वाघिण अखेर डार्ट करून बेशुद्ध
रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे येथील मुख्य पशुवैद्यकीय डॉक्टर हेमराज यांनी वाघिणीला यशस्वीपणे डार्ट केल्यानंतर ती बेशुद्ध झाली. वाघिणीला ताब्यात घेण्यासाठी वनविभागाच्या पथकांकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या नरभक्षक वाघिणीने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः रविवार आणि सोमवार सलग दोन दिवस वाघिणीचा आतंक कायम राहिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती वाढली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी