
नांदेड, 07 सप्टेंबर (हिं.स.)।कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ या संकल्पनेनुसार ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमांतर्गत दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी, एकाच वेळी 500 ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत.या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार व नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात 22 ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्यात देगलूर महाविद्यालय, उदगीर रोड, देगलूर; श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनखेड, ता. लोहा; ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळाकोळी, ता. लोहा; श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शंकरनगर, ता. बिलोली; ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विष्णुपुरी, नांदेड; श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कंधार; ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेहरूनगर, कंधार; लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद; संत बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, कामठा, ता. अर्धापूर; हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर; श्री दत्त आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सिनियर कॉलेज, हदगाव; दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, भोकर; ग्रामीण एसीएस महाविद्यालय, वसंतनगर, मुखेड येथे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूस, गोकुंदा, ता. किनवट; बंदा बैरागी बंदासिंघजी बहादूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुदखेड; परमवीर चक्र विजेता कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नायगाव; संतकवी दासगणू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरी; हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथेही रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
नांदेड शहरातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पहिला मजला, शासकीय तंत्रनिकेतन, आनंदनगर रोड; श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था; शासकीय तंत्रनिकेतन, यशवंत कॉलेज रोड तसेच श्री हजूर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाफना टी-पॉईंट येथेही रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात येणार आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी
रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बेरोजगार तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी जॉब सीकर रजिस्ट्रेशन फार्म (Job Seeker Registration Form) भरून आपली प्राथमिक माहिती अचूकपणे नोंदवावी. जॉब सीकर रजिस्ट्रेशनच्या https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी.
उद्योग व नियोक्त्यांसाठी ऑनलाइन नोंदणी
रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करू इच्छिणारे उद्योग, उद्योग समूह, एमएसएमई, आस्थापना व नियोक्त्यांनी एम्पलॉयर रजिस्ट्रेशनच्या https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6 या लिंकवर एम्प्लॉयर रजिस्ट्रेशन फॉर्म भरून आवश्यक माहिती अचूक व पूर्णपणे सादर करावी.जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी तसेच विविध उद्योग, उद्योग समूह, एमएसएमई, आस्थापना व नियोक्त्यांनी या रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड. दूरध्वनी : 02462-251674, मोबाईल : 9272484161 व ई-मेल : nandedrojgar01@gmail.com यावर संपर्क साधावा.
--------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis