
रत्नागिरी, 7 सप्टेंबर (हिं.स.) । केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याबाबतची मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या मसुदा अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवाशांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींना पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ मधील तरतुदीनुसार मसुदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत आपले आक्षेप अथवा हरकती नोंदवता येणार आहेत. नागरिकांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली - ११०००३ या पत्त्यावर सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय समाविष्ट गावांची संख्या अशी : खेड : ८५ गावे, संगमेश्वर : ८१ गावे, राजापूर : ५१ गावे, लांजा : ५० गावे, चिपळूण : ४४ गावे (एकूण ५ तालुके : ३११ गावे)
दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील १३ जिल्ह्यांमधील ५६ तालुक्यांत मिळून एकूण २ हजार ५१५ गावांचा समावेश पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी